सत्य मी जेव्हा लिहाया लागतो

मई 10, 2007 at 7:08 पूर्वाह्न (खावर, गझल)

सत्य मी जेव्हा लिहाया लागतो
हात माझा थरथराया लागतो

त्यास जेव्हा पाहतो जवळून मी
तो मला माझा दिसाया लागतो

आजही झालो ऋतूने धुंद की,
आजही मी गुणगुणाया लागतो

रोज हल्ली चालते माझे असे
झोपलो की बडबडाया लागतो

वाटते जेव्हा रडावेसे मला
त्याचवेली मी हसाया लागतो

संकटांनी झोडले ‘खावर’ तरी
मी पुन्हा उठुनी जगाया लागतो

स्व. बदिउज्जमा खावर

Advertisements

परमालिंक 3 टिप्पणियाँ

अभंगांच्या ठिणग्या

मई 8, 2007 at 7:06 पूर्वाह्न (अभंग, भाऊ पंचभाई)

माझ्या अभंगांना, भिमाचा सुगंध
करुणेचा गंध, गंधाळतो…

सुर्याचेही झालो, आम्ही महासूर्य
एवढे हे धैर्य, भिमामुळे…

यारे लेकरांनो, संकटाना सांगा,
आम्ही तोडू टांगा, संकटांच्या…

आपले काळीज, आपण भाजावे
खुडूखुडू खावे, एकट्याने…

एवढी ही रांग, आरोपांची दारी
आणि मी भिकारी, काय देऊ?

घरकूल माझे, वाळूचे बांधले
कणकण सांधले, चालतांना…

भाऊ पंचभाई

(गझलेच्या शेराप्रमाणे प्रत्येक अभंग सार्वभौम.)

परमालिंक टिप्पणी करे

माळ

मई 4, 2007 at 12:50 अपराह्न (गझल, श्रीकृष्ण राऊत)

शब्दात आग आहे; अर्थात जाळ नाही
भाषाच कोरडी की  तोंडात लाळ नाही.

पाहून चार किरणे भुलला कसा दिशा तू?
सूर्यास्त होत आहे सध्या सकाळ नाही.

तू वांझ गाजलेली; आई कसा म्हणू मी?
पान्ह्यात दूध नाही, काखेत बाळ नाही.

अर्धा उभार फसला आहे नदीत  जो तो ;
काठावरील म्हणती पाण्यात गाळ नाही.

रक्तात स्फोट करतो ज्वालामुखी कधीचा;
तू मानतोस तितकी छाती मवाळ नाही.

जगतो म्हणून त्याला झाली असेल फाशी;
प्रेतावरी बघा ना काहीच आळ नाही!

दु:खात नाचणार्‍या असतील खूप वेश्या;
माझ्यातरी व्यथेच्या पायात चाळ नाही.

खाऊ कसा चवीने मी मांस माणसांचे;
माझ्या गळ्यात देवा ती ‘खास’ माळ नाही!

श्रीकृष्ण राऊत

परमालिंक टिप्पणी करे

हे असे का?

मई 1, 2007 at 10:04 पूर्वाह्न (गझल)

हे असे का रोजचे येणे तुझे
कोणते माझ्याकडे देणे तुझे

आठवावे सांजवेळी सारखे
हात हे हातामधे घेणे तुझे

मी कसा झाकू छताला मोडक्या
उंबर्‍याशी थांबले मेणे तुझे

हासला माझ्या घराचा कोपरा
बोलणे का ऐकले तेणे तुझे

कोणत्या मातीत होते कोरले
फार झाले देखणे लेणे तुझे

वाहतो आयुष्य मी पायी तुझ्या
ऋण फिटावे थोडके जेणे तुझे

या भुईने कोठवर सोसायचे
मेघ हे वार्‍यावरी नेणे तुझे!

-वंदना पाटील
पान्हेरा ता.मोताळा जि.बुलडाणा

परमालिंक 1 टिप्पणी

वगैरे!

अप्रैल 25, 2007 at 10:04 पूर्वाह्न (कुसुमाग्रज)

कधी तुझ्यास्तव
मनात भरते
मेघ पिणारे
चांदल नाते
दवात जे घर
बांधूनि राही
पण ते नाही
प्रेम वगैरे!

तव शरिरातून
कधी पेटती
लाल किरमिजी
हजार ज्योती
त्यात मिळाया
पतंग होतो
परि नसे ते
काम वगैरे!

कधी शिवालय
पांघरुनी तू
समोर येता
विरती हेतू
मनात उरते
मात्र समर्पण
मी नसतो पण
भक्त वगैरे!

रंगित असले
धुके धराया
सार्थ शब्द हे
अपरे वाया
त्या पलिकडचा
एक जरासा
दिसे बरासा
फक्त वगैरे!

-कुसुमाग्रज

परमालिंक 1 टिप्पणी

कळेना

अप्रैल 25, 2007 at 9:57 पूर्वाह्न (गझल)

ऋतुंच्या कशा हालचाली कळेना
असावे तुझे पाय खाली, कळेना

गरज,तत्त्व,निष्ठा उन्हे पावसाळी
करावी कुणाची दलाली कळेना

व्यथेच्या महाली भुते काय व्याली
क्ष्णांची भुते दास झाली,कळेना

फिरे भार घेऊनी सार्‍या जगाचा
मला सावलीची हमाली कळेना

ठणक आतडीची उदरशाप झाली
कशी लागते भूक ‘साली’ कळेना

मरण शेवटी शाप देऊन गेले
कुणावर कशी वेळ आली, कळेना!

-तुळशीदास खराटे,पुसद

परमालिंक टिप्पणी करे

सवाष्ण

अप्रैल 25, 2007 at 9:50 पूर्वाह्न (श्रीकृष्ण राऊत)

तलखी पिवळी झोंबत अंगा
काळवंडली कात सावळी;
अंकुरलेल्या चैतन्याने
तिच्यावरी ये झाक जांभळी.

मानेभवती पडल्या खाचा,
बाही उतरे खांद्याखाली;
लेकुरवाळ्या स्पर्शसुखाने
ताठर चोळी थैली झाली.

राबराबत्या संसाराच्या
विरंगुळ्याला नसती खाडे
बिनाचिडीची रात आंधळी
समागमाला रुतती हाडे.

गालफडांनी बसून गावे
शृंगाराचे कडू गोडवे;
हातामध्ये ढिल्या बांगड्या
पायामधले ढिले जोडवे.

श्रीकृष्ण राऊत, अकोला

परमालिंक टिप्पणी करे

पुन्हा कधीतरी..

अप्रैल 18, 2007 at 10:24 पूर्वाह्न (मंगेश पाडगांवकर)

सांज सरे
भय भरे
वाट नागमोडी..

हलू लागे
कलू लागे
रक्तातील होडी..

आज नको
इथे नको
पुन्हा कधीतरी..

मला हवा
तुला हवा
गुन्हा कधीतरी…

मंगेश पाडगावकर

परमालिंक टिप्पणी करे

कसाई

मार्च 5, 2007 at 1:15 अपराह्न (लोकनाथ यशवंत)

कसाई माझ्यावर
खूप प्रेम करतो.
तो माझा नंबर
सर्वात शेवटी लावणार आहे
लोकनाथ यशवंत

परमालिंक टिप्पणी करे

साईन

नवम्बर 27, 2006 at 12:27 अपराह्न (मुक्तछंद)

टीचभर पोरगं
हाणते औत
तेव्हा बापाचं
पिळवटून जाते मन
पण थकलेल्या देहाला
लागते विसाव्याची तहान.
कानाडोळा करत
बाप घेतो विसावा
नेमके तिथेच होते
साईन
जिंदगीचे मरणाच्या ऍग्रीमेंटवर!

– हेमंतकुमार एकनाथ कांबळे
(स्वप्न हरविलेल्या रानात)

परमालिंक टिप्पणी करे

Next page »