का ?

November 26, 2006 at 7:10 am (मुक्तछंद)

तुझ्या खूप कोरड्या वागण्यातच
मी वाहून जाते,
तुला मात्र डुबायला
पूरच का लागतो?
-मनिषा साधू ( मावळत का नाहीस?)

Permalink Leave a Comment

काय झाले?

November 22, 2006 at 6:59 am (गझल)

आसवांचे,यातनांचे,पाखरांचे काय झाले?
पेटलेल्या पिंजऱ्यांचे, वादलांचे काय झाले?

वाळवंटाचा प्रवासी केवढा हैराण झाला!
चालताना हे अचानक मृगजळांचे काय झाले?

नेमके ते काय होते जे तुझ्या ओठी न आले
जन्म ज्यांचा अंत होता,त्या कथांचे काय झाले?

शेवटी ते युद्ध होते… शेवटी युद्धात सांगा
कौरवांचे काय झाले? पांडवांचे काय झाले?

पत्थरांच्या कोणत्या शहरातला मी राहणारा,
माझिया पदरातल्या फुलपाखरांचे काय झाले?

-अमोल ज्ञानेश्वर
विद्यर्थी वसतीगृह,बा.आं.महाविद्यालय औरंगाबाद.

Permalink 1 Comment

तू आई झाल्यामुळे!

November 22, 2006 at 6:44 am (मुक्तछंद)

एका अनामिक धुंदीत…
पुन्हा वलू लागतात
माझी पाऊले
तुझ्या
मंत्रमुग्ध पारिजातकी
आकर्षणाकडे…
म्हणूनच
मला निर्विवाद
सामाऊन घेणारा तुझा
निळा… हिरवा… समुद्र
पुन्हा चंद्रशीतल ठेव.
कारण तुझ्या
मखमली पाऊलखुणांवर
माझे हळवे प्रेमांकुर
अधिक दुप्पट बहरात येतायत.
तू आई झाल्यामुळे!
-दिनेश सातव,नांदुरा जि.बुलडाणा

Permalink Leave a Comment

शोधतोय संत

October 8, 2006 at 6:54 am (अभंग, गणेश भाकरे)

त्याचा देह गेला
पंचनाम्यासाठी
सोडुनिया गाठी
संसाराच्या…

मातीमुळे झाली
आयुष्याची माती
विझल्यात वती
पणतीच्या…

पेरावं वावर
धरावं रुमणं
सांगावं गऱ्हाण्म
मातीलाच…

कधी पावसानं
कधी दलालानं
दिलं नाही पाणी
घोटभर….

चांदण्या रात्री
दारात काळोख
झाली ना ओळख
चांदण्याची…

त्याच्या मरणाची
आहे कुणा खंत
शोधतोय संत
त्याच्यासाठी…….

गणेश भाकरे,बोरगांव रेमण्ड,जि. छिंदवाडा.

Permalink Leave a Comment

माय

September 29, 2006 at 3:41 am (वामन निंबाळकर)

जसा दिस बुडून जाई काळोखाचे राज्य असे
आम्ही बसू दरवाज्यात झोपडीत साधा दिवाही नसे
घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे
भाकरी जात बडवल्या कुठे चून कुठे वांगे
नाकत जाई वास त्याचा पोटात असे अंधार सारा
तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यात धारा
अंधारला चिरते तेव्हा एक सावली जड येई
डोई तिच्या भारा असे चालतांन तोल जाई
काळी काळी कृश देह ती असे माझी माय
वणवण सकाळपासून मोळीसाठी रानात जाय
वाट पाहत बसू कधी तिची सारे आम्ही भाऊ
मोळी नसे विकत तेव्हा भुकेलेले झोपी जाऊ
एकदा कय झाले कसे आम्हा काही कळले नही
माय आली पाय बांधून भळाभळा रक्त वाही
चावला साप मोठा काळा दोन बाया होत्य सांगत
फणा काढून मारला त्याने हळूच गेला निघून रांगत
माय पडली धरणीवर गंडे झाले, मंत्र झाले, वैद आला
दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला
हंबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर
शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो
दिसता कृश मोळीवाली मोळी तिची विकत घेतो.

वामन निंबाळकर

Permalink Leave a Comment

जिंदगी

September 24, 2006 at 6:04 am (गझल)

किती कठीण सर्कशीतली कमाल जिंदगी!
किती कठीण आजचा दिसे सवाल जिंदगी!

उभा करून माणसास रंगमंचकावरी,
करून चालली किती किती धमाल जिंदगी!

असेच सत्य राहिले युगे युगे जिथेतिथे,
कुठे खुशाल जिंदगी, कुठे बकाल जिंदगी!

जिथे तुझ्याच अंतरातली विहीर कोरडी,
भरून आणणार काय तू पखाल जिंदगी?

तुझाच आसरा मिळायला हवा खराखुरा,
म्हणेन मोडक्या घरास मी महाल जिंदगी!

‘नज़ीम’ पांघरायला हवा तुला उजेड जर,
तुझी करून जा कधीतरी मशाल जिंदगी!

नज़ीम खान
साईनगर, मलकपूर पांग्रा
ता-सिंदखेड राजा जि.बुलडाणा

Permalink Leave a Comment

विश्वास ठेव

September 11, 2006 at 2:01 pm (नारायण सुर्वे)

इतका वाईट नाही मी; जितका तू आज समजतेस

दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी; हे असे दिवस आले

आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत; तूच पदराचे शीड उभारलेस

हताश होऊन गोठलो; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण, किती सांगू, किती करून देऊ याद

पळे युगसमान भासली;नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास, आकुल, डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको

आधीच शरमिंदा झालो आहे; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही; हवीच तर घृणाही ठेव.

ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

नारायण सुर्वे (सनद)

Permalink 1 Comment

तु गेल्यावर…

August 25, 2006 at 3:53 am (बा.भ.बोरकर)

तु गेल्यावर फिके चांदने,घरपरसुही फिके फिके
मुले मांजरापरी मुकी अन् दर दोघांच्या मध्ये धुके

तु गेल्यावर घरातदेखील पाऊल माझे अडखळते
आणि आटुनी हवा भवतीची श्वासास्तव मन तडफडते

तु गेल्यावर या वाटेने चिमणीदेख़ील नच फिरके
कसे अचानक झाले नकळे सगळे जग परके परके

तु गेल्यावर जडून पनगत लागे पिंपळ हाय गळू
गलयातले मम झुरते गाणे वात मरते हळूहळू

तु गेल्यावर दो दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती
खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती?

बा.भ.बोरकर(चांदनवेल)

Permalink Leave a Comment

पाठ

July 29, 2006 at 5:23 am (गझल, सुरेश भट)

सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले?
खातरी झाली न त्याची.. ते घरी डोकावले!

हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती..
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले?

ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
(शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!)

मी न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे
दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले?

वना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले!

वेचण्या जेव्हा निघालो माणसांची आसवे
माझियामागे भिकारी शब्द सारे धावले!

वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले!

सुरेश भट

Permalink Leave a Comment

कोलंबसाचे गर्वगीत

July 15, 2006 at 7:44 am (कुसुमाग्रज)

कोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशून मातू दे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही, दुभंग धरणीला कराया, पाजळू दे पलिता
की स्वर्गातून कोसळलेला, सूडसमाधान मिळाया, प्रमत्त सैतान
जमवूनी मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान
पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभ माथ्यावरती
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका ना कुठली भीती
सहकाऱ्यांनो, का ही खंत, जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम
काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहून घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा?
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती, जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नव क्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा, घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला!”

– कुसुमाग्रज

Permalink Leave a Comment

« Previous page · Next page »