माळ
शब्दात आग आहे; अर्थात जाळ नाही
भाषाच कोरडी की तोंडात लाळ नाही.
पाहून चार किरणे भुलला कसा दिशा तू?
सूर्यास्त होत आहे सध्या सकाळ नाही.
तू वांझ गाजलेली; आई कसा म्हणू मी?
पान्ह्यात दूध नाही, काखेत बाळ नाही.
अर्धा उभार फसला आहे नदीत जो तो ;
काठावरील म्हणती पाण्यात गाळ नाही.
रक्तात स्फोट करतो ज्वालामुखी कधीचा;
तू मानतोस तितकी छाती मवाळ नाही.
जगतो म्हणून त्याला झाली असेल फाशी;
प्रेतावरी बघा ना काहीच आळ नाही!
दु:खात नाचणार्या असतील खूप वेश्या;
माझ्यातरी व्यथेच्या पायात चाळ नाही.
खाऊ कसा चवीने मी मांस माणसांचे;
माझ्या गळ्यात देवा ती ‘खास’ माळ नाही!
श्रीकृष्ण राऊत