हे असे का?

May 1, 2007 at 10:04 am (गझल)

हे असे का रोजचे येणे तुझे
कोणते माझ्याकडे देणे तुझे

आठवावे सांजवेळी सारखे
हात हे हातामधे घेणे तुझे

मी कसा झाकू छताला मोडक्या
उंबर्‍याशी थांबले मेणे तुझे

हासला माझ्या घराचा कोपरा
बोलणे का ऐकले तेणे तुझे

कोणत्या मातीत होते कोरले
फार झाले देखणे लेणे तुझे

वाहतो आयुष्य मी पायी तुझ्या
ऋण फिटावे थोडके जेणे तुझे

या भुईने कोठवर सोसायचे
मेघ हे वार्‍यावरी नेणे तुझे!

-वंदना पाटील
पान्हेरा ता.मोताळा जि.बुलडाणा

1 Comment

  1. vachunbagha said,

    अप्रतिम!

    कृपया लिहित रहा.

    धन्यवाद !

Post a Comment