सत्य मी जेव्हा लिहाया लागतो

May 10, 2007 at 7:08 am (खावर, गझल)

सत्य मी जेव्हा लिहाया लागतो
हात माझा थरथराया लागतो

त्यास जेव्हा पाहतो जवळून मी
तो मला माझा दिसाया लागतो

आजही झालो ऋतूने धुंद की,
आजही मी गुणगुणाया लागतो

रोज हल्ली चालते माझे असे
झोपलो की बडबडाया लागतो

वाटते जेव्हा रडावेसे मला
त्याचवेली मी हसाया लागतो

संकटांनी झोडले ‘खावर’ तरी
मी पुन्हा उठुनी जगाया लागतो

स्व. बदिउज्जमा खावर

Permalink 1 Comment

अभंगांच्या ठिणग्या

May 8, 2007 at 7:06 am (अभंग, भाऊ पंचभाई)

माझ्या अभंगांना, भिमाचा सुगंध
करुणेचा गंध, गंधाळतो…

सुर्याचेही झालो, आम्ही महासूर्य
एवढे हे धैर्य, भिमामुळे…

यारे लेकरांनो, संकटाना सांगा,
आम्ही तोडू टांगा, संकटांच्या…

आपले काळीज, आपण भाजावे
खुडूखुडू खावे, एकट्याने…

एवढी ही रांग, आरोपांची दारी
आणि मी भिकारी, काय देऊ?

घरकूल माझे, वाळूचे बांधले
कणकण सांधले, चालतांना…

भाऊ पंचभाई

(गझलेच्या शेराप्रमाणे प्रत्येक अभंग सार्वभौम.)

Permalink Leave a Comment

माळ

May 4, 2007 at 12:50 pm (गझल, श्रीकृष्ण राऊत)

शब्दात आग आहे; अर्थात जाळ नाही
भाषाच कोरडी की  तोंडात लाळ नाही.

पाहून चार किरणे भुलला कसा दिशा तू?
सूर्यास्त होत आहे सध्या सकाळ नाही.

तू वांझ गाजलेली; आई कसा म्हणू मी?
पान्ह्यात दूध नाही, काखेत बाळ नाही.

अर्धा उभार फसला आहे नदीत  जो तो ;
काठावरील म्हणती पाण्यात गाळ नाही.

रक्तात स्फोट करतो ज्वालामुखी कधीचा;
तू मानतोस तितकी छाती मवाळ नाही.

जगतो म्हणून त्याला झाली असेल फाशी;
प्रेतावरी बघा ना काहीच आळ नाही!

दु:खात नाचणार्‍या असतील खूप वेश्या;
माझ्यातरी व्यथेच्या पायात चाळ नाही.

खाऊ कसा चवीने मी मांस माणसांचे;
माझ्या गळ्यात देवा ती ‘खास’ माळ नाही!

श्रीकृष्ण राऊत

Permalink Leave a Comment

हे असे का?

May 1, 2007 at 10:04 am (गझल)

हे असे का रोजचे येणे तुझे
कोणते माझ्याकडे देणे तुझे

आठवावे सांजवेळी सारखे
हात हे हातामधे घेणे तुझे

मी कसा झाकू छताला मोडक्या
उंबर्‍याशी थांबले मेणे तुझे

हासला माझ्या घराचा कोपरा
बोलणे का ऐकले तेणे तुझे

कोणत्या मातीत होते कोरले
फार झाले देखणे लेणे तुझे

वाहतो आयुष्य मी पायी तुझ्या
ऋण फिटावे थोडके जेणे तुझे

या भुईने कोठवर सोसायचे
मेघ हे वार्‍यावरी नेणे तुझे!

-वंदना पाटील
पान्हेरा ता.मोताळा जि.बुलडाणा

Permalink 1 Comment