कळेना

April 25, 2007 at 9:57 am (गझल)

ऋतुंच्या कशा हालचाली कळेना
असावे तुझे पाय खाली, कळेना

गरज,तत्त्व,निष्ठा उन्हे पावसाळी
करावी कुणाची दलाली कळेना

व्यथेच्या महाली भुते काय व्याली
क्ष्णांची भुते दास झाली,कळेना

फिरे भार घेऊनी सार्‍या जगाचा
मला सावलीची हमाली कळेना

ठणक आतडीची उदरशाप झाली
कशी लागते भूक ‘साली’ कळेना

मरण शेवटी शाप देऊन गेले
कुणावर कशी वेळ आली, कळेना!

-तुळशीदास खराटे,पुसद

Post a Comment