साईन
टीचभर पोरगं
हाणते औत
तेव्हा बापाचं
पिळवटून जाते मन
पण थकलेल्या देहाला
लागते विसाव्याची तहान.
कानाडोळा करत
बाप घेतो विसावा
नेमके तिथेच होते
साईन
जिंदगीचे मरणाच्या ऍग्रीमेंटवर!
– हेमंतकुमार एकनाथ कांबळे
(स्वप्न हरविलेल्या रानात)
का ?
तुझ्या खूप कोरड्या वागण्यातच
मी वाहून जाते,
तुला मात्र डुबायला
पूरच का लागतो?
-मनिषा साधू ( मावळत का नाहीस?)
काय झाले?
आसवांचे,यातनांचे,पाखरांचे काय झाले?
पेटलेल्या पिंजऱ्यांचे, वादलांचे काय झाले?
वाळवंटाचा प्रवासी केवढा हैराण झाला!
चालताना हे अचानक मृगजळांचे काय झाले?
नेमके ते काय होते जे तुझ्या ओठी न आले
जन्म ज्यांचा अंत होता,त्या कथांचे काय झाले?
शेवटी ते युद्ध होते… शेवटी युद्धात सांगा
कौरवांचे काय झाले? पांडवांचे काय झाले?
पत्थरांच्या कोणत्या शहरातला मी राहणारा,
माझिया पदरातल्या फुलपाखरांचे काय झाले?
-अमोल ज्ञानेश्वर
विद्यर्थी वसतीगृह,बा.आं.महाविद्यालय औरंगाबाद.
तू आई झाल्यामुळे!
एका अनामिक धुंदीत…
पुन्हा वलू लागतात
माझी पाऊले
तुझ्या
मंत्रमुग्ध पारिजातकी
आकर्षणाकडे…
म्हणूनच
मला निर्विवाद
सामाऊन घेणारा तुझा
निळा… हिरवा… समुद्र
पुन्हा चंद्रशीतल ठेव.
कारण तुझ्या
मखमली पाऊलखुणांवर
माझे हळवे प्रेमांकुर
अधिक दुप्पट बहरात येतायत.
तू आई झाल्यामुळे!
-दिनेश सातव,नांदुरा जि.बुलडाणा