पाठ

July 29, 2006 at 5:23 am (गझल, सुरेश भट)

सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले?
खातरी झाली न त्याची.. ते घरी डोकावले!

हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती..
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले?

ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
(शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!)

मी न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे
दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले?

वना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले!

वेचण्या जेव्हा निघालो माणसांची आसवे
माझियामागे भिकारी शब्द सारे धावले!

वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले!

सुरेश भट

Permalink Leave a Comment

कोलंबसाचे गर्वगीत

July 15, 2006 at 7:44 am (कुसुमाग्रज)

कोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशून मातू दे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही, दुभंग धरणीला कराया, पाजळू दे पलिता
की स्वर्गातून कोसळलेला, सूडसमाधान मिळाया, प्रमत्त सैतान
जमवूनी मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान
पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभ माथ्यावरती
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका ना कुठली भीती
सहकाऱ्यांनो, का ही खंत, जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम
काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहून घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा?
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती, जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नव क्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा, घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला!”

– कुसुमाग्रज

Permalink Leave a Comment

सांभाळ बा विठू

July 15, 2006 at 4:46 am (अभंग)

युगे अठ्ठाविस विटेवरी उभा

बडव्यांचा ताबा, तुझेवरी 1

शिनला पुंड्लिक चेपुनिया पाय

गेले बाप माय, वृद्धाश्रमी 2

विसरली जनी, दळण कांडण

घालते रांधण, मोलकरी 3

सावताही गेला सोडुनिया मळा

लागलासे लळा, नगराचा 4

गेले नामा तुका, संतकर्मयोगी

उरलेले भोगी, लुटायाशी 5

धुवोनिया पाप विटाळली भीमा

उल्लघली सीमा अन्यायाची 6

धूप दीप आर्त्या टाळ्यांचा गजर

अखंद जागर मंबाजीचा 7

सांभाळ बा विठू डोईचा किरीट

कडी घाल नीट, गाभाऱ्याची 8

हरीभाऊ गिरपुंजे, वर्धा

Permalink Leave a Comment

औदुंबर

July 5, 2006 at 4:38 am (बालकवी)

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट्लागली हिरवी गरदी पुढें
पायवाट पांढरी तयांतुनी अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाक्कुनी जळात बसला असला औदुंबर .

बालकवी

Permalink 1 Comment