माणूस केलंत तुम्ही मला!

June 27, 2006 at 3:37 am (मंगेश पाडगांवकर)

इतकं दिलंत,
इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला!

पावसाळ्यात तर
वर्षावाला मिती नव्हती;
माझी ओंजळ
कधीसुद्धा रिती नव्हती!

पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही
तुमचं प्रेम सरी झाल्या,
मला शोधत घरी आल्या!
इतकं दिलंत….

तसा मी माझ्यातच गुंग होतो,
स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो,
मीच माझ्या खुशीचा रंग होतो

तरी तुम्ही मानून घेतलत,
माझं मन जानून घेतलत!
इतकं दिलंत…..

भिऊन माझ्या सावलीला
पळत होतो,
नको त्या वळणावर वळत होतो,
एकलेपणात हताश होऊन
जळत होतो….

तुम्ही मला भिजवलंत,
हिरवगार रूजवलंत !
इतकं दिलंत….

तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना
तुमच्या मायेत
चिंब भिजून न्हाताना,
तुमच्या समोर
उभं राहून गाताना,
मन असं भरून येतं
डोळ्यातून झरून येतं !

डोळ्यात जेव्हा आसवं असतात
तेव्हाच माणसं माणसं असतात !

इतकं दिलंत,
इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला!

मंगेश पाडगावकर

Permalink Leave a Comment

मायबोली

June 21, 2006 at 3:02 pm (सुरेश भट)

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहतो खरेच धन्य एकतो मराठी
शर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुळाकुळात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नभानभात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकामधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
सुरेश भट (रूपगंधा)

Permalink 1 Comment

ग्वाही

June 20, 2006 at 1:03 pm (असंग्रहीत, मुक्तछंद)

मी एक मुस्लीम म्हणून…
मला हे लोक
देशद्रोही म्हणून छळतात
वेळोवेळी मला टाळतात
अन् मी भरडला जातो
गव्हातील किड्याप्रमाणे
विनाकारण निर्दयपणे
परंतु तेव्हाही माझे
अंतर्मन देत असते
एकच ग्वाही…
मी एक सच्चा मुसलमान आहे
या मातीशी इमानी राहील
मेल्यानंतर पुरतील हे लोक मला
अन् मी या मातीत
मिसळून जाईल…..

शेख बिस्मिल्ला
सोनोशी ता- सिंदखेड ऱाजा
जि. बुलडाणा

Permalink Leave a Comment

खंदाळी

June 5, 2006 at 12:16 pm (असंग्रहीत, वर्‍हाडी कविता)

तुयी फाटकी खंदाळी नाई लाज कपसाले
मन भरलं ना व्याजाचं भोगून टापसाले

तुरीसंग पोरी मनी हयद लाऊन बसल्या
काया काया अभायाच्या त्याही मनात ठसल्या
बारावानी जवानीबी घरी लागली गयाले

तुया कापसाची गादी त्याच्या मादीले लोयाले
हाळाचं दुखनं सारं राती कये या मातीले
कसा ठेवावा कापूस समईतल्या वातीले

तुया देहाचंच खत झालं कर्जाच्या येलाले
दोराचाबी कचे जीव फाशी घेताना गयाले
लय बेसरम झाली काय म्हनू या खादीले?
तुयी फाटकी खंदाळी…

दिनेश गावंडे
बाभूळगाव(जहां),अकोला

Permalink 3 Comments

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन

June 5, 2006 at 12:04 pm (नारायण सुर्वे)

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन
तेव्हा एक कर
तू निःशंकपणे डोळे पूस.
ठीकच आहे चार दिवस-
उर धपापेल, जीव गुदमरेल.
उतू जणारे हुंदके आवर,
कढ आवर.
उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस
खुशाल, खुशाल तुला आवदेल असे एक घर कर
मला स्मरून कर,
हवे अत्र मला विस्मरून कर.

नारायण सुर्वे

Permalink Leave a Comment

का ?

June 4, 2006 at 5:07 am (असंग्रहीत, मुक्तछंद, लोकनाथ यशवंत)

माझा मार्गदर्शक म्हणाला होता
मला मायभूमीच नाही !
मायभूमीच नाही तिथं
गाव कुठून?

अवर्षाणात बेडूक खांद्यावर बांधून
नाचणंही बंद केलंय आताशा आम्ही
कारण-
आमच्या वेदनेचा पाऊस परक्या गावात का ?

लोकनाथ यशवंत

Permalink Leave a Comment

जाणिव

June 4, 2006 at 4:53 am (ना. घ. देशपांडे)

सांध्यरसाने रंगत रंगत
वाहत होता कोमल वारा
अवकाशाचे अंतर उजळत
उमटत होती एकच तारा

तू आणिक मी बसून तेथे
बोलत होतो सहजच काही
सहजच सारे वाटत नव्हते
त्या दिवशी पण तुला मलाही

उमजत नव्हते हे की ते वा
ती तर सजणे; होती प्रीती
होती प्रीती; परंतु तेव्हा
जाणिव नव्हती, जाणिव नव्हती!

दैवगतीने वाहत वाहत
अनेक वर्षांनंतर सजणी
असेच आलो, बघ अनपेक्षीत
आपण दोघे एक ठिकाणी!

पुन्हा तू नि मी बसलो येथे
बोललीस तू, मी पण काही
सहजच वाटत नाही पण ते
आज खरोखर तुला मलाही

अजाण होतो मागे आपण
नव्हती जाणिव होती प्रीती
उरली आहे आज, सखे पण
जाणिव नुसती, जाणिव नुसती !

Permalink Leave a Comment