कळते रे!

May 30, 2006 at 1:21 pm (सुरेश भट)

कळते मज सारे कळते रे!
मन माझे तरीही चळते रे!

राखत आले सखया अजवर
विचारले नसण्याचे अंतर
शब्द तुला भेटतील नंअत्र
आयुष्य न मागे वळते रे!

कळते मज तू अवख़ळ वारा
कळते मज तूरिमझिम धारा
…कधी दुरचा पहाटवारा
तव रूप कसेही छळते रे!

कळते रे हे तुझेच अंगण
जिथे फुलांची नाजूक पखरण
थकले रे, आले तरीही पण
का दार तुझे अडखळते रे!

सुरेश भट

Permalink Leave a Comment

"———" (एक कविता माझीही)

May 30, 2006 at 12:31 pm (गणेश धामोडकर)

“तुझ्या मौनाचा अर्थ
कुठल्या डिक्शनरीत शोधू;
सांगशील का? “
“———”

गणेश धामोडकर

Permalink Leave a Comment

आकाश उजळले होते

May 30, 2006 at 12:07 pm (गझल, सुरेश भट)

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

सुरेश भट(एल्गार)

Permalink Leave a Comment